जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
भोर, ता.१४:कानवडी–खानापूर : रस्ता नाही… खड्ड्यांचे साम्राज्य! गेल्या तब्बल १५ वर्षांपासून रखडलेल्या कानवडी–खानापूर मार्गाची दुरवस्था आता नागरिकांच्या सहनशीलतेपलीकडे गेली आहे. रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक बनला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) कानवडी ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी व प्रवाशांनी अनोखे आंदोलन केले.
सकाळी सुमारे नऊच्या सुमारास शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये चक्क वृक्षारोपण केले. त्यानंतर हळदी-कुंकू व औक्षण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘रस्ता कधी होणार?’ या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी या अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला.
या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जातात. शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करावी लागते, तर नागरिकांना दैनंदिन कामांसाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसून, दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग विशेषतः धोकादायक ठरत आहे.
१५ वर्षे झाली, तरी रस्ता कागदावरच? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. केवळ आश्वासनांचा पाऊस पाडण्याऐवजी प्रत्यक्ष काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
‘आश्वासनांचा रस्ता संपला; आता विकासाचा रस्ता द्या!’ आणि ‘आता आश्वासन नको, रस्ता हवा!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तातडीने दर्जेदार रस्त्याचे काम सुरू न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थ, शेतकरी व विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिला.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 40









