जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
मुंबई, ता.२ : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापलेलं राजकारण जोर धरतंय. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास तब्बल ५ कोटी मराठे मुंबईत धडकतील, असा इशारा देत जरांगेंनी पुन्हा एकदा संघर्षाची जाहीर हाक दिली आहे.
जरांगे पाटलांनी कडक उपोषण सुरू केलं असून, आता त्यांनी पाणीबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. “सरकारकडे अजून वेळ शिल्लक आहे, मात्र जर तात्काळ निर्णय घेतला नाही, तर मराठा समाज शांत बसणार नाही,” असं ते ठामपणे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला आहे. “सामाजिक काम करताना शिव्या-टिका सहन करावी लागते,” असा फडणवीसांचा पलटवार असला तरी, जरांगे मागे हटायला तयार नाहीत. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, ही त्यांची अट कायम आहे.
मात्र, जरांगे यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांचा कडवा विरोध सुरू आहे. बैठका, चर्चा, वक्तव्यांचा सपाटा सुरू असून समाजात तणावाची भावना वाढताना दिसतेय.
याच पार्श्वभूमीवर शाहू महाराज छत्रपती यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. “सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे,” अशी त्यांची थेट मागणी. शशिकांत शिंदे यांनी देखील सरकारला कोणताही उशिर न करता मार्ग काढण्याचं आवाहन केलं आहे.
सरकार एकीकडे हैदराबाद व सातारा गॅझेटवर चर्चा करतंय, कोर्टानं घातलेले पेच सोडवायचा प्रयत्न करतंय; पण दुसरीकडे रस्त्यावरचा तणाव वाढतोय. विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर सत्ताधारी ओबीसींच्या मुद्द्यावर विरोधकांना आव्हान देत आहेत.
आता मोठा प्रश्न असा की – सरकार जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करणार का? की मधला मार्ग काढणार?
पण एक गोष्ट नक्की – जरांगे पाटलांनी उठवलेलं वादळ आता महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणार हे मात्र नक्की.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 85