“लाचखोरी : विकासाचा घातक अडथळा”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूजचा विशेष रिपोर्ट
पुणे, ता.२० : आजच्या युगात सर्वात मोठा शत्रू दहशतवाद, महागाई किंवा बेरोजगारी नाही… तर लाचखोरी आहे! सामान्य माणूस शासनाची दारे ठोठावतो, पण त्याला स्वागत करणारा पहिला हात म्हणजे लाच मागणारा असतो. “काम हवे? मग पैसे द्या!” – हा अलिखित नियम झाला आहे. लाच दिल्याशिवाय काम होत नाही, ही वस्तुस्थिती नागरिकांच्या आत्म्याला चिरडणारी आहे.
ही लाचखोरी फक्त एखाद्या अधिकाऱ्याची भूक भागवत नाही, तर संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीला गळफास घालते. रस्ते का तुटतात? पाणीपुरवठा का थांबतो? शाळा, रुग्णालये का ढासळतात? कारण विकासासाठी आलेला निधी जनतेपर्यंत न पोहोचता तो भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात शोषला जातो. हक्काच्या पैशासाठी घाम गाळणारा शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय त्याच पैशाचा अन्यायकारक वापर बघून संतप्त होतो.
लाचखोरीमुळे प्रामाणिक माणूस सतत चिरडला जातो. नियम पाळणारा माणूस कार्यालयाच्या दारात चकरा मारतो, त्याचा वेळ, पैसा आणि मानसिक आरोग्य संपते; पण ज्याने ‘खिसा गरम’ केला त्याचे काम चुटकीसरशी होते. ही स्थिती म्हणजे न्यायाचा गळा घोटणारी व्यवस्था!
यापुढे हे सहन करायचे नाही. लाचखोरी करणारा दोषी आहेच, पण लाच देणारा तितकाच गुन्हेगार आहे. जर आपणच “ठेव घे, काम कर” म्हणालो, तर दोष कुणाचा? आपण जर ठामपणे लाच देणे नाकारले, तर मागणाऱ्याचे हात थरथरतील. समाजानेच ठरवले पाहिजे की “लाच घेणाऱ्याला बहिष्कार, आणि लाच देणाऱ्याला लाजिरवाणे स्थान!”
कायदे आहेत, कारवाईही होते, पण प्रश्न आहे तो इच्छाशक्तीचा. कठोर शासन, जागरूक जनता आणि प्रामाणिक नेतृत्व मिळाले तरच हा महारोग संपेल. नाहीतर लाचखोरीची विषारी साखळी आपले भविष्य गिळंकृत करत राहील.
लाचखोरीविरुद्ध प्रत्येक नागरिक उठला तरच खरा बदल शक्य आहे. अन्यथा नेत्यांची भाषणे आणि जाहिरातींमध्येच “विकास” राहणार, आणि प्रत्यक्षात आपले गाव, आपले शहर, आपला देश अंधारातच बुडणार!
लाचखोरी संपली, तरच भारत खऱ्या अर्थाने महासत्ता बनेल!
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क – ७५८८६२२३६३
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai