जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे, ता.१८ : “आई… आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून माझा उपचार होणार नाही का?” — अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रश्नाला आता हजारो पालकांना सामोरे जावे लागणार नाही. कारण राज्य सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार १८ वर्षांपर्यंतच्या सर्वच बालकांवर होणाऱ्या मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
या अंतर्गत हृदय, न्यूरो, कॉकलिअर इंप्लान्ट, प्लास्टिक सर्जरी, दंतचिकित्सा, डोळ्यांचे उपचार, कर्करोगावरील शस्त्रक्रिया अशा जीव वाचविणाऱ्या उपचारांचा समावेश आहे. आतापर्यंत आर्थिक अडचणींमुळे हजारो बालकांना वेळेत योग्य उपचार मिळत नव्हते. अनेक कुटुंबांची स्वप्ने अर्धवट तुटत होती. मात्र आता हा निर्णय त्यांच्या डोळ्यांत आशेचा नवा किरण घेऊन आला आहे.
कोठे मिळणार सुविधा?
ससून रुग्णालय (पुणे), येरवडा, पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालय, तसेच मुंबईतील केईएम, नायर, सायन अशा प्रमुख शासकीय रुग्णालये तसेच काशीबाई नवले रुग्णालय,आदित्य बिर्ला हॉस्पिटल आदी रुग्णालयात या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांनाही जिल्हा रुग्णालयातून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कोण पात्र?
१८ वर्षांपर्यंतची सर्व मुले या योजनेस पात्र आहेत. विशेष म्हणजे शासकीय शाळांत शिकणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना प्राधान्य दिले जाणार आहे. पालकांनी संबंधित शासकीय डॉक्टरांकडे संपर्क साधला तरी पुढील प्रक्रिया रुग्णालये स्वतः करतील.
मोफत होणारे उपचार
जन्मजात विकार, हृदय शस्त्रक्रिया, अस्थिरोग शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, न्यूरो शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी (फाटलेले ओठ, तालु दुरुस्ती), कॉकलिअर इंप्लान्ट, डोळ्यांचे उपचार (आयऑफ्थॅल्मॉलॉजी) आणि दंतचिकित्सा यांचा यात समावेश आहे.
गरीब पालकांसाठी मोठा दिलासा
आजवर मोठ्या शस्त्रक्रियांसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असे. त्यामुळे अनेक गरीब पालक मुलांना उपचारापासून वंचित ठेवण्यास भाग पाडले जात होते. पण या निर्णयामुळे उपचारांचा बोजा आता सरकार उचलणार आहे. त्यामुळे हजारो बालकांना नवे आयुष्य मिळणार असून, पालकांच्या डोळ्यांतून समाधानाश्रू उमटणार आहेत.
हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल मानला जात आहे. “पैशाअभावी मुलांचा जीव जाऊ नये, हीच खरी समाजाची जबाबदारी” हे सरकारने प्रत्यक्षात उतरवले असून, हा निर्णय महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांना नवे जीवनदान देणारे ठरले आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 73