जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
म्हसोबावाडी, ता. ८ – केंद्रीय रेशीम बोर्डाच्या वतीने ‘मेरा रेशीम, मेरा अभिमान’ या अभियानांतर्गत म्हसोबावाडी येथे रेशीम चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच राजेंद्र राऊत, ग्रामसेवक सोनाली गवळी, पोलीस पाटील अॅड. तुषार झेंडे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
चर्चासत्रात म्हसोबावाडीतील ६५ रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला, यामध्ये ३० महिला शेतकऱ्यांचा समावेश होता. केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ डॉ. सुनील राठोड यांनी रेशीम बागेतील व्यवस्थापन, शेडमधील निर्जंतुकीकरण, उझी माशी नियंत्रण, अळ्यांच्या आरोग्याचे संवर्धन आणि उच्च प्रतीचा किडा तयार करण्याच्या पद्धती याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. राठोड यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, वेळोवेळी शेड तपासणी, योग्य आहार व्यवस्थापन यांचे महत्त्व पटवून दिले. या मार्गदर्शनाचा फायदा गावातील रेशीम उत्पादकांना होणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
डॉ. राठोड यांना विभागाच्या वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक नीता डांग यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज चांदगुडे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांनी रेशीम उद्योगाच्या प्रगतीसाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 429










