जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर (दि.८ऑगस्ट) :- इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी, या गावाचे नाव उज्ज्वल करणारी गौरवशाली बातमी आता समोर आली आहे, पंकज गोपाळ गोरे या होतकरू युवकाची एकाच वेळी अन्नपुरवठा निरीक्षक – दौंड तहसील, पुणे विभाग आणि परिविक्षा अधिकारी – महिला व बालविकास विभाग, पुणे, महाराष्ट्र राज्य या दोन्ही महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर निवड झाली आहे.
या दुहेरी यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्यांनी अत्यंत मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ही दोन्ही पदे मिळवली असून, हे गावातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
या गौरवशाली प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे इंदापूर पश्चिम विभाग चिटणीस मनोज चांदगुडे यांनी देखील पंकज गोरे यांचे विशेष कौतुक करत त्यांच्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले की, ” पंकज गोरे यांची ही निवड संपूर्ण इंदापूर तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा आहेत. अशा तरुणांनी प्रशासनात सक्रिय होणे ही समाजासाठी मोठी सकारात्मक गोष्ट आहे.”
तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, युवक व मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांनी फटाके वाजवत, पुष्पगुच्छ देऊन तसेच पेढे वाटून त्यांच्या यशाचा आनंद साजरा केला.
या यशस्वी कामगिरीमुळे म्हसोबाचीवाडीचे नाव राज्यभरात उजळले असून, पंकज गोरे यांचे कार्य व नावलौकिक भविष्यात समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 205