जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती – एसटी बसमधील कोयत्याच्या थरकापाने एक निष्पाप महिला प्रवासी आपला जीव गमावून बसली. दहा दिवसांपूर्वी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत गंभीर मानसिक आघात झालेल्या वर्षा रामचंद्र भोसले (वय ४३, रा. यादगार सिटी, बारामती) यांचे आज (७ ऑगस्ट) पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचं मोठं आभाळ कोसळलं आहे.
ही घटना १ ऑगस्ट रोजी बारामती-वालचंदनगर मार्गावर काटेवाडी येथे घडली. बारामती आगाराची बस (MH-14 BT 3506) सकाळी ९.४५ वाजता बारामतीहून इंदापूरकडे निघाली होती. बसमध्ये जवळपास ६० प्रवासी होते. काटेवाडी उड्डाणपुलाजवळ एक माथेफिरू प्रवाशाने अचानक कोयत्याने दुसऱ्या प्रवाशावर हल्ला चढवला. या प्रकारामुळे बसमध्ये एकच खळबळ माजली. या धक्कादायक प्रसंगामुळे बसमधील महिला प्रवासी वर्षा भोसले या जागीच बेशुद्ध झाल्या.
प्रथम त्यांना बारामतीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले. तिथेही प्रकृती ढासळत गेली आणि अखेर त्यांनी आज प्राण सोडले.
ही घटना केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर संपूर्ण बसमधील प्रवाशांवर आघात करणारी ठरली. हल्लेखोराने स्वतःवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या सगळ्या प्रसंगामुळे प्रवासी भयभीत झाले होते.
वर्षा भोसले या कामानिमित्ताने प्रवास करत होत्या. पण एका विचित्र आक्रमणामुळे त्यांचा प्रवास मृत्यूत संपला. त्यांच्या जाण्याने कुटुंब उघड्यावर आले असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह