जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
मुंबई दि.६: मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेसाठी दोन कोटींहून अधिक अर्ज आले असताना, शासनाने आर्थिक ओझं लक्षात घेता अपात्र लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर तपासणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सध्या तब्बल २७ लाख महिलांची घरोघरी पडताळणी सुरू असून, एकूण अपात्र महिलांची संख्या ५० लाखांवर जाण्याची शक्यता आहे.राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या आधारे २६ लाख ३४ हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांच्या यादी जिल्ह्यनिहाय अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आली आहे. त्या महिला २१ वर्षांखालील किंवा ६५ वर्षांवरील वयोगटातील आहेत, तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थ्यांचा समावेश आहे.
याआधी, योजनेतून चारचाकी वाहनधारक महिला, अन्य शासकीय लाभ घेणाऱ्या महिला, सरकारी नोकरदार, तसेच बोगस पुरूष लाभार्थी वगळण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीनंतर हा पडताळणीचा टप्पा वेगाने राबवला जात आहे.
सुरुवातीला अंदाजित खर्च दरवर्षी ५४ हजार कोटी रुपये लागणार होता. मात्र, २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात फक्त ३६ हजार कोटींचीच तरतूद करण्यात आली. त्यामुळे शासनाने निकष कठोर करत अपात्र लाभार्थी गाळण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या काही दिवसांत आणखी कडक निकषांच्या आधारे पडताळणी होणार असून, अंतिम टप्प्यात तब्बल ५० लाख महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह