भाटघर धरणातून आजपासून विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
भोर (ता. २६ जुलै): भाटघर धरणातील पाणीपातळीत मोठी वाढ होत असल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुरुवारी (दि. २५ जुलै) रात्री ९.३० वाजेपर्यंत धरण ९२.४३ टक्के भरले असून, धरणात येणाऱ्या जोरदार आवक लक्षात घेता उद्या म्हणजेच शुक्रवारी (दि. २६ जुलै) सकाळी ८ वाजता भाटघर धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रामार्फत नदीपात्रात १७५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर, कार्यकारी अभियंता इंजि. दि. म. डुबल यांनी एक महत्त्वाची सूचना जारी करून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात कोणत्याही प्रकारचे काम सुरू असेल, तर संबंधित विभागांनी कामगार व बांधकाम साहित्य तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे. पिण्याच्या पाण्यासाठी वा शेतीसाठी लावलेले पंपही तातडीने सुरक्षित स्थळी हलवावेत. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने आगाऊ सूचना देऊन योग्य ती उपाययोजना करावी, असेही सांगण्यात आले आहे.
सदर विसर्गाची माहिती स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला देण्यात आली असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह