जनसंघर्ष न्यूज नेटवर्क –संपादकीय
शिरवळ:- सार्वजनिक शिव महोत्सव समितीचे संस्थापक स्वर्गीय हरिभाऊ मारुती भापकर शेठ यांच्याकडून शिरवळ येथे सन १९६९-७० साली सगळ्यात पहिली शिवजयंती सुरू करण्यात आली आणि शिवछत्रपतींचा पराक्रमी इतिहास घराघरात पोहोचवण्याचे काम या माध्यमातून त्यांच्याकडून करण्यात आले. आज जवळपास या कार्यास ५५ वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या या शिव कार्याला प्रचंड मोठे स्वरूप आज रोजी प्राप्त झाले आहे. शिवजयंती ते शिवमहोत्सव पर्यंतचा हा प्रवास खूपच रोमहर्षक आणि ऐतिहासिक झाला आहे, स्वर्गीय हरिभाऊ भापकर शेठ यांनी मुंबई वरून शिरवळ येथे आल्यानंतर या शिवजयंती कार्याची सुरुवात केली, त्या काळात अगदी एका रूपया पासून वर्गणी गोळा केली जात होती, जमा झालेल्या वर्गणीचा व खर्चाचा सर्व हिशोब एका कागदावर व्यवस्थित लिहून तो शिवाजी चौकात त्यांच्या सायकल दुकान बाहेर लावला जायचा.
त्यावेळी दुकान बाहेरील मोकळ्या जागेत टेबलावर शिवछत्रपतींचा पुतळा ठेवून पुष्पहार अर्पण करून पूजा अर्चा व्हायची, त्याच ठिकाणी मांडव टाकला जायचा व सकाळी १० वाजता बैलगाडीतून शिवछत्रपतींच्या प्रतिमेची मिरवणूक संपूर्ण शिरवळ गावामधून काढली जायची. याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुसऱ्या दिवशी भजन कीर्तनाचा कार्यक्रम साजरा व्हायचा ! येथेच शिवजयंती साजरी केली जाऊ लागली, म्हणूनच या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव त्याकाळात पडले. पुढे जाऊन शिवजयंतीच्या तारखांवरून वाद निर्माण होऊ लागल्याने या कार्यास नुकतेच शिवजयंती ऐवजी शिवमहोत्सव असे नाव देण्यात आले.
सार्वजनिक शिव महोत्सव समितीच्या वतीने विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम दरवर्षी राबविले जातात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगाची प्रेरणा घेऊन ऑक्सिबागेची निर्मिती करण्यात आली व नियमितपणे या बागेची देखरेख केली जाते. दरवर्षी गरजू गरजवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हातभार लावला जातो. शिवमहोत्सवाच्या माध्यमातून जखमी पिडीत अपघातग्रस्त गरजूंना मदत करण्यासाठी ध्रुव ॲम्बुलन्सची सेवा सुद्धा सुरू करण्यात आली आहे. तसेच विविध सामाजिक धार्मिक कार्यातही समितीचा मोलाचा सहभाग असतो. त्याचप्रमाणे लहान मुले व युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ओवी प्रभा नृत्य अकॅडमी यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी राबवले जातात. त्याचबरोबर क्रीडाक्षेत्रातही विविध खेळाडूंना सहकार्य केले जाते विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात, शिवजयंती व शिवराज्याभिषेक साजरा करताना सोलापूर ते शिरवळ मार्गी जाणाऱ्या शिवभक्तांची भोजन व निवासाची सोय दरवर्षी केली जाते, कोरोनाचा काळ सर्वांनी खूप जवळून पाहिला त्या काळात शिवमहोत्सव अन्नछत्र या माध्यमातून गरजू लोकांना अन्नाची सोय तीन महिने करत होते.
त्याचप्रमाणे कोणी गरीब व्यक्ती निधन पावली किंवा त्यांच्या मागे कोणीही नसेल किंवा आर्थिक परिस्थिती नसेल तर स्मशानभूमी येथे त्याचे सर्व अंतिम संस्कार सार्वजनिक शिवमहोत्सवच्या माध्यमातून सर्वजण करत असतात. अशा अनेक कार्यात शिवमोहोत्सव समितीचे मोलाचे योगदान असते स्वर्गीय हरिभाऊ भापकर शेठ यांनीच शिकविलेल्या शिवकार्याचा आदर्श घेऊनच आम्ही हे कार्यक्रम राबवीत आहोत सार्वजनिक शिव महोत्सव म्हणजे शिरवळकरांसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे. हत्ती घोडे उंट सरदार मावळे स्त्री कलाकार लाईटची भव्य रोषणाई फटाक्यांची नेत्र दीपक आतिषबाजी ढोल लेझीम यासारखे विविध पारंपारिक खेळ यामुळे तर मिरवणूक अतिशय भव्य आणि दिव्य दिसते.
ही मिरवणूक पाहण्यासाठी खूप दूर दूर हून लोक दरवर्षी न चुकता आवर्जून मोठ्या संख्येने येतात या भव्यदिव्य अशा नेत्र दीपक कार्यासाठी अहोरात्र झटणारे आमचे मावळे शुभचिंतक हितचिंतक कळत नकळत विविध मार्गाने मदत करणारे सहकारी देणगीदार वर्गणीदार जाहिरातदार आणि सभासद या सर्वांचा या कार्यात मोलाचा वाटा आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच तर हे कार्य दरवर्षी अधिकाधिक विस्तारत आहे यापुढील वाटचालीतही आपणा सर्वांचे असेच सहकार्य लाभो हीच अपेक्षा राहील.असे मत जनसंघर्ष न्यूजच्या प्रतिनिधींसमोर बोलताना सार्वजनिक शिवमहोत्सव, समिती शिरवळ, कार्याध्यक्ष श्री.आदेश हरिभाऊ भापकर यांनी व्यक्त केले आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 174