जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी या गावामध्ये गावठाण , चांदगुडे वस्ती, कवडे वस्ती ,दाभाडे वस्ती, तसेच थोरवे वस्ती येथे केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी असणाऱ्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून पहिली योजना ही १ कोटी १० लाख रुपये खर्च करून कार्यान्वीत करण्यात आली, तर दुसरी जलजीवन योजना अंदाजे १ कोटी ४५ लाख रुपये खर्चून २०२२ साली काम सुरू करण्यात आले. परंतू दुसऱ्या जलजीवन योजनेचे मोटरसाठी लागणारे विद्युत कनेक्शन घेण्यासाठीचे डिपॉझीटच भरले नसल्याकारणाने ही योजना डिपॉझीट भरण्यावाचून बंद आहे तसेच ही योजना चालू होण्याअगोदरच काही ठिकाणी लाकडी निंबोडी जलसिंचन योजनेच्या कामांमुळे जलजीवन योजनेची पाईपलाईन फुटली आहे तसेच घरोघरी देण्यात येणारी नळ कनेक्शनची काम ही रखडली असल्याचे एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर जनसंघर्ष न्यूजच्या प्रतिनिधींना सांगितले आहे .तसेच ते बोलताना पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाई योजनेतून निरगुडे येथून चांदगुडे वस्तीसाठी तब्बल २२ लाख रुपये इतका शासन निधी खर्च करून पाईपलाईन टाकण्यात आली परंतू ही योजना सुद्धा बंद अवस्थेत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. एकीकडे शासन प्रत्येक वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून कोट्यावधींचा निधी खर्च करून अशा योजना राबवत असते परंतू ग्राऊंड लेवलला या योजनांचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येते तसेच या योजनांचा वापर केवळ पैसा लाटण्याचे माध्यम होताना दिसत आहे या गोष्टींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे असे सुर आता सर्वसामान्य नागरिकांकडून उमटू लागले आहेत.
आतापर्यंत झालेल्या योजनांपैकी त्यातील एकच जलजीवन मिशनची योजना फक्त कार्यान्वीत असून त्या योजनेमधून आठ दिवसाला पाणी केवळ अर्धा तास सुटत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. तसेच योजनेचा घोटाळा झाला तर पंधरा पंधरा दिवस पाणी सुटत नाही, कन्हेरीकडून चालू असलेल्या या जलजीवन योजनेवर वाड्या-वस्त्यांना आणि मुळगावाला पाणी अपुरे पडत आहे. तसेच गेल्या एक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली दुसरी जलजीवन मिशन योजना व तिसरी जिल्हा परिषदेच्या पेयजल योजनेतून निरगुडे या गावातून दुरुस्त केलेली योजना तर पाइप लाईन टाकून सुद्धा चालूच करण्यात आली नाही तसेच त्या योजनेला विहिरीत मोटरचं टाकण्यात आली नाही तरी या योजनेची संपूर्ण बिलं मात्र संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकारी यांनी काढून घेतली आहेत. त्यामुळे या दोन्ही योजनांची पुर्ती वाट लागल्याचे सध्याचे तरी चित्र दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांची राज्य सरकारच्या माध्यमातून चौकशी होऊन त्या सुरू करण्यात याव्यात जेणेकरून तहानलेल्या जीवांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळेल. नाहीतर अशी परिस्थिती होईल , विहीर आहे उशाला मात्र कोरड आहे घशाला .
सध्या उन्हाळ्याची तीव्रता अधिकच वाढल्यामुळे तसेच गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने सर्व बोअर तसेच विहीरींची पाण्याची पातळी मोठया प्रमाणात खाली जाण्यास सुरुवात झाली आहे यामुळे गावठाणातील तसेच वाडया वस्त्यांवरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा सामना हा करावा लागू शकतो, तसेच या परिसरातील नागरिकांना गेल्या वर्षी आपले पशुधन वाचवण्यासाठी विकतचे पाणी आणून त्यांची तहान भागविण्याचे काम केले आहे तसेच शासनाच्या माध्यमातून शेवटी वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. हि वेळ पुन्हा येऊ नये म्हणून संबंधित प्रशासनाकडून वेळेपुर्वीचं उपाय योजना होणे गरजेचं आहे असे मत गावातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
म्हसोबाचीवाडी गावठाण आणि वाडयावस्त्यांवरील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांचे म्हणने असे आले की, संबंधीत विभागाने पाणीटंचाईकडे वेळीच लक्ष देऊन उपाय योजना कराव्यात जेणेकरून गेल्यावर्षी सारखी पाणी टंचाईची अवस्था निर्माण होणार नाही.
………..
चौकट
जल जीवन योजनेच्या कामाची मुदत संपली असून काम पूर्ण करण्यात आलेले नाही. तसेच अधिकारी व ठेकेदार यांनी अपूर्ण काम असताना सुद्धा ९०% बिले काढण्यात आल्याने आता विद्युत पुरवठा करण्यासाठी पैसे नसल्याने आकडा टाकून गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे बोगस कामाची चौकशी होऊन संबंधित अधिकारी, व संबंधित ठेकेदार यांचेवर कायदेशीर कारवाई करून ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी नाव न घेण्याच्या अटीवर ग्रामपंचायत सदस्याने केली आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामातील हलगर्जीपणा मुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करून बदल्या केलेल्या आहेत. त्याच धर्तीवर ग्रामपंचायत म्हसोबाचीवाडी येथील केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी जल जीवन योजनेशी संबंधित अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांचेवर मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करणार ? असा सवाल आता गावातील नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.
….

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह