जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
दौंड : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावामध्ये सर्वाधिक ९३ पात्र लाभार्थ्यांना घरकुलांची मंजूरी देण्यात आली आहे. दि.२२ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे येथील बालेवाडी संकुलामध्ये केंद्रीय मंत्री मा. अमित शाह यांच्या हस्ते पार पडलेल्या कार्यक्रमाला स्वामीचिंचोली येथून सर्वाधिक लाभार्थी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर ग्रामपंचायतीने सर्व लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीच्या प्रमाणपत्रांचे वाटप केले होते. सर्वांसाठी घरे या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेला स्वामीचिंचोली या गावातून भरपूर प्रतिसाद मिळला आहे. मा. मुख्य कार्यकारी जि.प.पुणे यांच्या सूचनेनुसार व मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामीचिंचोली येथे दि. १ मार्च ते ८ मार्च या कालावधी मध्ये सर्वच घरकुलांचे भूमीपूजन पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे यांनी दिली. घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकल्याचा पाहवयास मिळत होता.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार स्वामीचिंचोली येथील सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांचे हप्ते आले नसल्यास त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करून सरसकट पात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन त्याला गती देण्यात यावी.
-प्रशांत काळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती दौंड
स्वामी चिंचोली या गावामध्ये सर्वाधिक घरकुलं मंजूर असल्यामुळे लाभार्थ्यांची बैठक घेऊन त्यांना घरकुल बांधकामासाठी वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे, जेणेकरून घरकुलांचं बांधकाम वेळेत पूर्ण होऊन अनुदानाचा योग्य विनियोग होईल. तसेच दर गुरुवारी घरकुल बांधकामांचा आढावा घेण्यात येणार आहे.
स्वाती लोंढे, ग्रामपंचायत अधिकारी, स्वामी चिंचोली
घरकुल बांधकाम वेळेत पूर्ण झाले तर त्याचा फायदा लाभार्थ्यांनाच होणार आहे. त्यामुळे वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन त्यांनी करावं .
– सौ. पूनम मदने, सरपंच स्वामी चिंचोली

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह