जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
मुंबई:- मुंबई पोलिसांच्या वतीने २०२५ सालच्या येणाऱ्या होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी या सणांसाठी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष अशी नियमावली लागू करण्यात आली आसून , यामध्ये दि. १२ मार्च २०२५ पासून १८ मार्च २०२५ पर्यंतच्या कालावधीत हे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. या काळामध्ये अश्लील प्रकारची गाणी वाजवणे, अनोळखी व्यक्तींवर रंग फेकणे तसेच समाजा समाजात तेढ निर्माण करणारी कृत्ये टाळण्याचे स्पष्ट आदेश पोलीसांच्या वतीने देण्यात आले आहेत. तसेच मुस्लिम बांधवांचा रमजान महिना लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी काढलेली नियमावली मध्ये काय आहे ?
मुंबई पोलिसांकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन आणि शांतता भंग करणाऱ्या कृतींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
पोलिसांच्या आदेशानुसार खालील नियमांचे पालन करावे लागणार आहे
अश्लील प्रकारचे शब्द किंवा घोषणांचे उच्चारण किंवा अश्लील गाणी वाजवणे यासाठी बंदी असणार आहे.
प्रतिष्ठा आणि नैतिकता दुखावणारी चिन्हे, पोस्टर्स, चित्रे किंवा घोषणांचा प्रसार यामध्ये टाळावा.
अनोळखी पादचारी यांच्या अंगावर रंग, पाणी किंवा पावडर फेकल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
यामध्ये पाण्याने किंवा रंगांनी भरलेले फुगे बनवणे आणि एखाद्याच्या अंगावर फेकण्यास सक्त मनाई असणार आहे.
हा नियम मोडल्यास कोणती शिक्षा होणार ?
या आदेशांचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना दंड आणि शिक्षा होणार आहे. याबाबतचे आदेश हे १२ मार्च २०२५ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते १८ मार्च २०२५ रोजीच्या रात्री १२.०० वाजेपर्यंत लागू असणार आहेत .
होळी या सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना वृक्षतोडीपासून परावृत्त करण्यात आले आहे. तसेच अनधिकृत प्रकारे वृक्षतोड केल्यास १ हजार पासून ५ हजार रुपयांपर्यंतचा दंड आणि एक आठवड्यांपासून ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा यामध्ये ठोठावण्यात येईल.
मुंबई पोलिसांच्या वतीने नागरिकांनी हा सण साजरा करताना कायदेशीर गोष्टींचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच याचे नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, त्यामुळे या सांस्कृतिक उत्सवांचा आनंद घेत असताना शिस्तीचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे पोलीसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह