जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती : (दि.३ मार्च ) बारामती शहरामध्ये मध्यवर्ती भागात परिवहन महामंडळाकडून जवळपास ५० कोटी रुपयांचा निधी खर्च करून अत्याधुनिक व सर्व सोयी सुविधायुक्त असे सुसज्ज बसस्थानक अजितदादा पवार यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आले आहे. तसे बस स्थानकाची इमारत ही एखाद्या विमानतळाच्या धर्तीवर आकर्षक व देखण्या स्वरूपात निर्माण केली आहे, परंतू येथे सातत्याने होणार्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. बसस्थानकातील सुरक्षाव्यवस्था ही अत्यंत डळमळीत झाल्यानं येथे अनेकदा चोरीच्या घटना घडल्याच्या पहावयास मिळाल्या आहेत. तसेच येथील स्थानकावर सुरक्षारक्षकांची सतत वानवा आहे. बारामती शहरासह तालुक्यातील अन्य बसस्थानकं सुद्धा रात्रीच्या प्रवासासाठी असुरक्षितचं आहेत. पात्र या सर्व गोष्टींकडे महामंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे.
बारामती आगारामधून एसटी महामंडळाला दरवर्षी चांगल्या प्रकारचे उत्पन्न हे मिळत आसते. मात्र, या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणखी पोलिस कर्मचार्यांची आवश्यकता निर्माण झाली आहे. या बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत महिलांजवळील दागिने, तसेच रोख रक्कम भुरट्या चोरांकडून चोरीकरून लंपास करण्याच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत आसल्याचे पहावयास मिळत आहे.
रात्रीच्या वेळी बसस्थानकावर महिला सुरक्षारक्षक हे तैनात असले पाहिजेत असे अनेक प्रवाशांना वाटत आहे व त्यांनी त्यांची भावना माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. बसस्थानकाच्या बाहेर अवैध धंदयांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर विळखा घातल्याचे पहावयास मिळत आहे. बारामती शहर पोलिस ठाण्यापासून हे बसस्थानकाचं अंतर हे अत्यंत जवळ आहे. परंतु, स्थानकाबाहेर सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे पोलिसांचे लक्ष जात नाही, अशी आताची स्थिती आहे. बसस्थानकाच्या बाजूलाच वाहन पार्किंगची व्यवस्था ही चांगल्या प्रकारची आहे. परंतू, काही हुल्लडबाज वाहनचालक आपली वाहने थेट आगारामध्ये घेऊन जातात. त्यामुळे येथील स्थानकावर सातत्याने वादावादीचे प्रकार घडताना दिसत असल्याचे सध्याचे चित्र येथे आहे. या सर्व गोष्टींवर महामंडळ कधी लक्ष देणार असा सवालचं आता प्रवाशांकडून उपस्थित होऊ लागला आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह