जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः- बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावरती २१ जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे व त्याची २६ जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात येणार आहे. असं देखील या व्हायरल झालेल्या बातमीत सांगण्यात येत आहे. त्यामुळे खरंच राज्यात नवीन २१ जिल्हे तयार होणार का? याबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे प्रसार माध्यमांसमोर बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत. असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. मात्र जिल्हाधिकारी यांच्यावरचा वाढता ताण कमी करण्यासाठी काही जिल्ह्यांत अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याचे आस्थापना असा प्रस्ताव महसूल विभागाकडे प्रस्तावित आहे. असं देखील यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यात नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे आलेला नाही मात्र याबाबत पुढील जनगणना झाल्यानंतर निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतू अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण केली जाऊ शकतात. याबाबत चर्चा ही सुरु आहेत असे ते म्हणाले.
पुणे जिल्हयातील मावळ आणि बारामती, नागपूर जिल्हयातील काटोल , छ्त्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना नेमण्याचा प्रस्ताव १०० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा विचार महसूल विभागाकडून करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह