जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः- पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे गृहकर्ज देणाऱ्या फायनान्स कंपन्या कर्जदाराला कशा पद्धतीने चुना लावण्याचे काम करतात हे एका गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकाने पुढे आणले आहे त्यामध्ये गृहकर्ज प्रकरणी चुकीची व्याज आकारणी करणाऱ्या, बेकायदा दंडात्मक शुल्क वसूल करणाऱ्या इंडिया इन्फोलाईन हाउसिंग फायनान्स कंपनीला राज्य ग्राहक आयोगाने दणका दिला असून जादा व्याज व शुल्क ग्राहकाला व्याजासह परत द्यावेत असा आदेशचं राज्य ग्राहक आयोगानं दिला आहे.
रवींद्र सहस्रबुद्धे हे वित्तीय सल्लागार म्हणून पुण्यात अनेक वर्षे व्यवसाय करीत आहेत. त्यांनी इंडिया इन्फो लाईन हाउसिंग फायनान्स (IIHFL) कडून जून 2014 मध्ये गृह कर्ज घेतले होते. परंतु कर्जाबाबत आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर अतिशय बारकाईने अभ्यास करून त्यांनी फायनान्स कंपनीच्या गैरव्यवहारांविरुद्ध ग्राहक हक्क संरक्षण कोर्टात 2017 साली दाद मागितली होती.
ग्राहक हक्काची ही लढाई 7 वर्ष 5 महिने चिकाटीने लढून रवींद्र सहस्त्रबुद्धे या पुण्यातील ग्राहकाने न्याय मिळवला आहे. या फायनान्स कंपनीने चुकीच्या पद्धतीने आकारले ले 2 लाख 58 हजार 234 रुपये जुलै 2017 पासून 9 टक्के व्याजाने ग्राहकाला परत देण्याचा आदेश पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला होता आता राज्य ग्राहक आयोगानं देखील त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
पुणे जिल्हा ग्राहक कोर्टाने दिनांक 3 ऑगस्ट 2022 रोजी ग्राहकाच्या बाजूने दिलेल्या निकालाच्या विरोधात इंडिया इन्फॉलाईन कंपनीने राज्य आयोगापुढे जानेवारी 2023 मध्ये अपील दाखल केले. अपीलाचा निर्णय 6 जून 2024 ला झाल्यावर सुद्धा फायनान्स कंपनीने नुकसान भरपाई देण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. ग्राहकाने खास रिकवरी साठी दाखल केलेल्या अजून एका दाव्याचं वॉरंट निघायची वेळ आल्यावर शेवटच्या तारखेला फायनान्स कंपनीने नुकसान भरपाईचा डिमांड ड्राफ्ट कोर्टात जमा केला. आता जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नुकसान भरपाई रवींद्र सहस्त्रबुद्धे यांना मिळेल व सप्टेंबर 2017 ते जानेवारी 2025 पर्यंतचा 7 वर्षे 4 महिन्याचा लढा संपणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह