जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः – पुणे जिल्ह्यात १ हजार ८८८ केंद्र आहेत. आतापर्यंत २९८ केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. तर उर्वरित केंद्राची तपासणी ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी माध्यमांना दिली आहे.
या सेवा सुविधा केंद्रांमधून नागरिकांना देण्यात येणार्या सुविधांचा आढावा तसेच चालकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.याबाबत मापारी म्हणाले, सरकारच्या धोरणानुसार कामकाज होत आहे का, हे तपासले जात आहे. नसल्यास त्यांना येणार्या अडचणी सोडवून नागरिकांना सेवा तत्परतेने कशी मिळतील, यासाठी संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. सेवा पुरविण्याबाबत या केंद्र चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या अनोंदणीकृत सेवा देण्याचे प्रमाण केवळ ६० टक्केच आहे. त्यातही वाढ करण्यासाठी या चालकांना सूचना देण्यात येणार आहेत.
या गोष्टींची तपासणी होणार
तपासणी करण्यासाठी एक अर्ज तयार करण्यात आला आहे. त्यात प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार हा अर्ज भरून घेतला जाणार आहे. यात केंद्र सुरू आहे का, असल्यास परवाना दिलेल्या पत्त्यावर ते सुरू आहे का, हे तपासले जाणार आहे. सुरू असल्यास त्याचा फोटो आता पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे.
केंद्र सुरू करण्याची व बंद करण्याची वेळ काय, सेवा केंद्राचा लोगो असलेला फलक, नागरिकांना देण्यात येणार्या सेवांच्या दर सुचीचा फलक दर्शनी भागात लावला आहे का?, तसेच देण्यात येणार्या नोंदणीकृत सेवा, आकारले जाणारे शुल्क, त्याची पावती, अर्जांची स्थिती, प्रलंबितता, केंद्रातील आवश्यक सुविधा, इंटरनेट, सॉफ्टवेअर, लोकसेवा हक्क आयोगाचा फलक याचीही तपासणी केली जाणार आहे.
सेतू केंद्रातून नागरिकाने एखाद्या सेवेसाठी किंवा सुविधेसाठी अर्ज केल्यानंतर ठरलेल्या मुदतीत सेवा न मिळाल्यास संबंधित सेवा देणाऱ्या अधिकार्याच्या विरोधात जिल्हाधिकार्यांकडे दाद मागता येते. त्यासाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयात हेलपाटे मारावे लागतात. मात्र, अशी दाद मागण्यासाठी सेतू केंद्रा तच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बहुतांश नागरिक तसेच केंद्र चालक याबाबत अनभिज्ञ आहेत. केवळ एका क्लिकवर संबंधित अधिकार्याच्या विरोधात दाद मागता येते. त्यामुळे सर्व सेतू केंद्र चालकांना ही सुविधा नागरिकांना पुरविण्यासाठी निर्देश देण्यात येणार आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह