वर्षभराची ऊर्जा देणारा स्रोत मावळला; २२ जुलै आता वाढदिवस नव्हे, तर आठवणींचा दिवस उरला!
जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे, ता.१४ : २२ जुलै म्हटले की महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जनमानसात एक वेगळीच ऊर्जा संचारायची. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी, चाहत्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी जणू लोकोत्सवच असायचा. खेड्यापाड्यांपासून महानगरांपर्यंत सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा स्पर्धा, पर्यावरण व स्वच्छता मोहिमा अशा असंख्य उपक्रमांनी २२ जुलैचा दिवस गजबजून जायचा. मात्र, यंदा हीच तारीख कॅलेंडरवर पाहताना मन सुन्न होतय. वाढदिवसाऐवजी आता जयंती साजरी करण्याची वेळ आली आहे.
अजितदादा स्वतः मात्र वाढदिवसाच्या झगमगाटापासून कायमचं दूर राहिले. मोठमोठे फ्लेक्स, दिखाऊ कार्यक्रम अथवा स्वतःभोवती कौतुकाचे मखर त्यांना कधीच रुचले नाही. ‘वाढदिवस माझा आहे, मग ही थेरं कशाला? समाजाच्या उपयोगी काहीतरी करा,’ हा त्यांचा स्पष्ट आग्रह असे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला होणारे कार्यक्रम व्यक्तिपूजेपेक्षा समाजसेवेचे माध्यम बनले.
हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रुग्णांना आरोग्यसेवा, पर्यावरण आणि स्वच्छतेचे उपक्रम, गुरुजन गौरव, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे २२ जुलैला राज्यभर सेवाभावाचा जागर व्हायचा. कार्यकर्त्यांना या उपक्रमातून मिळणारी ऊर्जा पुढील वर्षभर काम करण्याची प्रेरणा द्यायची.
अजितदादांचे सामान्य माणसाशी असलेले नाते त्यांच्या साधेपणातून दिसून येत असे. मोरगाव परिसरात मेंढपाळाच्या कुटुंबाने रस्त्यात गाडी थांबवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तेव्हा दादांनी गाडी थांबवून त्या कुटुंबाशी मनमोकळेपणाने संवाद साधला. मेंढ्यांची संख्या, मुक्कामाचे ठिकाण, कळपाची परिस्थिती अशा बारकाव्यांची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. मोठ्या पदावर असूनही सामान्यांच्या सुख-दुःखाशी जोडलेले राहणे, हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद होती.
संकटाच्या काळात वाढदिवस साजरा करण्यासही ते नकार देत. ‘जनतेवर संकट असताना मी केक कसा कापू?’ या भूमिकेतून त्यांची संवेदनशीलता दिसून येत असे. स्वतःपेक्षा समाज, माणूस, पर्यावरण आणि शेवटच्या घटकाचा विचार करणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
आज २२ जुलै पुन्हा येईल. उपक्रम होतील, आठवणी जाग्या होतील; मात्र त्या गर्दीत दादांचा आवाज, त्यांची शाबासकीची थाप आणि ‘काम करत राहा’ ही प्रेरणा नसेल. वर्षभर ऊर्जा देणारा हा स्रोतच आता हरपला आहे.
ही पोकळी भरून निघणारी नाही. आठवणी लिहिताना हात थरथरतील, डोळे पाणावतील आणि मनात एकच प्रश्न घुमत राहील—ज्यांच्या अस्तित्वाने लाखो कार्यकर्त्यांना वर्षभराची ऊर्जा मिळायची, ते व्यक्तिमत्त्वच हरपल्यावर आता ती ऊर्जा कुठून आणायची?
अजितदादांची जयंती म्हणजे केवळ स्मरणाचा दिवस नव्हे; त्यांनी दाखवलेल्या सेवाभावी वाटेवर चालण्याची नवी शपथ घेण्याचा दिवस ठरावा, हीच खरी आदरांजली ठरेल.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 110,040









