जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
लोणावळा:-राजमाची किल्ला – शिवाजी महाराजांचा महत्त्वाचा ऐतिहासिक गड, दोन बालेकिल्ल्यांनी युक्त असलेला श्रीवर्धन व मनरंजन हा किल्ला आज पर्यटनासाठी प्रसिद्ध असला, तरी त्याच्या पायथ्याशी राहणारे आदिवासी बांधव आजही मूलभूत गरजांसाठी झगडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, आज ५० वर्षांपूर्वीचं जगणं जगते आहे.
“आजही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजच जगवतात,” असं उद्विग्न मनाने येथील स्थानिक म्हणतात. ना पाणी, ना आरोग्यसुविधा, ना रोजगार – राजमाची गावातल्या आदिवासी समाजाची स्थिती अतिशय हलाखीची आहे. अनेक दशकांपासून गडावरील पर्यटन वाढत असतानाही स्थानिकांच्या जीवनात कोणताही सकारात्मक बदल झालेला नाही.
राजमाची किल्ल्याला ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या अतुलनीय महत्त्व आहे. पुणे आणि कोकण यांना जोडणाऱ्या बोरघाटावरील हा प्रमुख गड व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे. स्वराज्याच्या सुरक्षेसाठी शिवाजी महाराजांनी याला आपल्या ताब्यात घेतले होते. १६५७ मध्ये कल्याण स्वारीनंतर या गडाचा मराठा साम्राज्यात समावेश झाला होता.
लोणावळा आणि कर्जत मार्गे गडावर जाण्याच्या पायवाटा आजही पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, या गडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी उधेवाडी गावात अजूनही रस्त्यांचा अभाव, आरोग्याची सोय नाही, आणि शिक्षणही अपुरं आहे.
सरकारकडून १९०९ साली राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेल्या या गडाला वारंवार प्रसिद्धी मिळत असली तरी गडाच्या मुळाशी राहणाऱ्या वारसांप्रती उपेक्षा मात्र कायम आहे.
हा वारसा केवळ पर्यटनासाठी नव्हे, तर संवर्धनासाठीही आहे. हे शौर्याचे स्थळ आणि त्याचे रक्षण करणारे खरे वारसदार – आदिवासी बांधव – यांच्या जीवनात बदल घडवणे हीच खरी छत्रपतींची आठवण ठरेल.
“फक्त पाहू नका… वाचा, बघा आणि बघतच रहा – आपण शंड होतोय की सजग?”

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह