जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती : ( दि.२३)घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य, त्यांच्या शिक्षणासाठी झगडणारे त्यांचे आई-वडील आणि त्यांच्या कष्टांना न्याय देणारी त्यांची मुले, ही प्रेरणादायक कहाणी आहे. बीड जिल्ह्यातील मूळचे असलेल्या सोनाजी पवार आणि फुलाबाई पवार यांच्या मुलांची. आपल्या मुलांनी मिळवलेले यश केवळ त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण वडार समाजासाठी आदर्शवत ठरले आहे.
१९९८ सालात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून सोनाजी व फुलाबाई पवार कामाच्या शोधात बारामती तालुक्यातील निरा बारामती रोडवरील कोऱ्हाळे बुद्रुक या गावात आले. तेव्हापासून त्यांनी शेतमजुर आणि त्याच बरोबर पाइपलाइन खणण्याचे काम सुरू केले. अशिक्षित असूनही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही. उलट पहाटे उठून उन्हा-तान्हाची व पावसाची पर्वा न करता त्यांनीं आपल्या संसारासाठी कष्ट घेतले.
आपली मुले स्थिरस्थावर झाली पाहिजे, त्यांना हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर दिसत होते. त्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव त्यांच्या मुलांना होती. त्या कष्टाचे चीज दोन्ही मुलांनी केले. मोठी मुलगी पूजा पवार हिने बारावी झाल्यानंतर प्रचंड मेहनत घेत मुंबई पोलीस दलात भरती होण्याचा मान मिळवला. तिचा आदर्श ठेवत धाकटा भाऊ राहुल पवार याने सुद्धा शिक्षणासोबत दगड फोडण्याचे काम करत पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली. अखेर पुणे पोलीस दलात त्याची सुद्धा निवड झाली.
पवार कुटुंबाची ही झेप म्हणजे जिद्दीची, मेहनतीची आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. पूजाचा आणि राहुलचा हा यशस्वी प्रवास केवळ त्यांच्या आई-वडिलांच्या संघर्षाची केवळ फळ नसून, वडार समाजातील अनेकांना प्रेरणा देणारा ठरत आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक गावात या त्यांच्या मिळालेल्या यशानंतर आनंदाचं वातावरण असून, आमच्या कष्टाचे चीज झालं, असे भावूक उद्गार सोनाजी आणि फुलाबाई पवार यांनी काढले. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द , चिकाटी, आणि कष्टाच्या जोरावर यश नक्की मिळवता येते, हे या पवार कुटुंबातील दोघा भाऊ बहिणीने दाखवून दिले आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 166