यवत गावात पुन्हा तणाव: आक्षेपार्ह पोस्टमुळे बाजार बंद, गाड्यांची जाळपोळ व मस्जिदची तोडफोड.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

दौंड:- ( दि.१ ऑगस्ट )शुक्रवार रोजी सकाळी यवत (ता. दौंड) या गावात एक धक्कादायक घटना घडली. गावातील एका मुस्लिम युवकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. सकाळी या पोस्टची माहिती समजताच संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास यवतमधील आठवडे बाजार बंद पाडण्यात आला.

या प्रकाराची झळ गावातील शांतता आणि सामाजिक सलोख्यालाही बसली. दुपारनंतर काही असामाजिक तत्वांनी यवत परिसरात गोंधळ उडवून दिला. काही दुचाकी गाड्यांना आग लावण्यात आली तर एका मस्जिदचीही तोडफोड करण्यात आली. या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं बंद ठेवली आहेत.

विशेष म्हणजे, केवळ काही दिवसांपूर्वीच २६ जुलै रोजी यवत येथील नीलकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्या घटनेचा संताप अजूनही लोकांच्या मनात ताजा असताना, आज पुन्हा सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात तणाव वाढला आहे.

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची ओळख सय्यद असे असून, तो यवतमधील सहकार नगर भागात राहतो. संतप्त ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी सहकार नगर भागात धाव घेत त्याच्या राहत्या घरावर हल्ला केला. घराची तोडफोड करण्यात आली. मात्र पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत मोठा अनर्थ टाळला.

यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सय्यद या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. सध्या गावात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आणि शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

ही घटना केवळ यवतपुरती मर्यादित न राहता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रशासनाने वेळीच योग्य ती भूमिका न घेतल्यास याचा परिणाम इतर गावांवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai