जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर – (दि.२७ जुलै) इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी परिसरातील फॉरेस्ट मधील वन्य प्राण्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हरिण,तरस, नीलगायी, ससे, मोर यासारख्या वन्य प्राण्यांमुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे अक्षरशः फडशा पडत असून अनेकदा शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
शेतकऱ्यांनी वेळोवेळी फॉरेस्ट विभागाकडे निवेदने देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस अशी कारवाई करण्यात आलेली नाही. निवेदने देऊन थकलेल्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडून त्यांच्या मागण्यांकडे फक्त केराची टोपलीच दाखवली जाते. हे अधिकारी प्रत्यक्षात जागेवर कधीच येत नाहीत, ना कोणतीही मदत करतात, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
विशेष म्हणजे या जंगलातून खडी क्रेशरला जाणाऱ्या अवजड वाहनांना मात्र मोकळा रस्ता देण्यात आला आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला असून त्यांना जंगलातून वाहन नेहण्यास मनाई असताना खडी क्रेशर मालकाला अभय देणे हा अर्थपूर्ण व्यवहार फॉरेस्ट खात्याकडून केला जान आहे, असा गंभीर आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून, या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक शेतकरी शेतीपासून दूर जात आहेत. वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी फॉरेस्ट खात्याकडे शेतीला कुंपण घालून देण्याची मागणी केली आहे. शासनाकडून कुंपणासाठी निधी मिळावा, गावठाण लगतच्या शेतीस प्राधान्याने संरक्षक व्यवस्था द्यावी, अशा मागण्या सातत्याने होत असल्या तरी अद्याप यावर कोणत्याही प्रकारची ठोस उपाय योजना अद्यापपर्यंत झालेली नाही. तरी या गोष्टींकडे संबंधित विभागाचे मंत्री लक्ष घालून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
या समस्येवर तातडीने उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा शेतकरी वर्गाचा विश्वास प्रशासनावरून उडेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. प्रशासनाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह