शिरवळ येथील श्री अंबिका माता यात्रेचा अक्षय तृतीया दिवशी होणार प्रारंभ…
जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
खंडाळा :- खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील १५० वर्षाची परंपरा असणाऱ्या श्री अंबिका मातेच्या यात्रेची सुरुवात दिनांक २८ एप्रिल रोजी पासून होणार आहे या दिवशी कमानपीर बाबाची संदल निमित्त भव्यदिव्य अशी मिरवणूक संपूर्ण गावामधून निघणार आहे तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी शिवजयंती निमित्त शिवाजी चौक शिरवळ येथून मिरवणूकीचा प्रारंभ होणार यामध्ये हत्ती, घोडे,उंट , ढोल ताशा पथक , विविध प्रकारची वाद्य तसेच विविध प्रकारच्या वेशभूषा आणि आकर्षक चित्ररथासह यामध्ये सहभागी होणार आहेत आणि ही मिरवणूक संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान संपूर्ण गावामधून निघणार आहे.
यात्रेच्या कार्यक्रमाची रूपरेषा
त्यानंतर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक ३० एप्रिल (अक्षय तृतीया ) रोजी यात्रेची खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे या दिवशी संध्याकाळी देवीच्या छबिन्याचा कार्यक्रम होणार आहे यामध्ये भव्यदिव्य असे दारूगोळा काम तसेच फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे तसेच यामध्ये ढोल पथक, लेझीम पथक, मल्लखांब पथक,दांडपट्टा पथक, छडीपट्टा पथक हे आपली कला ही या छबिन्या निमित्ताने सादरीकरण करणार आहेत, तसेच पंचक्रोशीतील खेळांची पथकं हे दरवर्षीप्रमाणे आपली कला सादर करण्यासाठी या यात्रेत येणार आहेत तसेच यात्रा कमिटीचे पंच यांच्या खेळाचे सादरीकरण पाहून बक्षीस वितरण करणार आहेत.
श्री अंबिका मातेचं पुर्णत्वाकडं आलेले असताना दिसणारं नवीन मंदिर..
यात्रेच्या चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक १ मे रोजी बसस्थानक जवळील मोकळ्या मैदानात सकाळी १० वाजता आणि रात्री ९ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध तमाशा पट्टू रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा नामांकित लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे या यात्रेनिमित्ताने ते आपली कला सादर करणार आहेत,तसेच या दिवशीच दुपारी ४ वाजता भव्यदिव्य असे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत पैलवान हे निकाली कुस्त्यांचे मैदान गाजवण्यासाठी यात्रेला येणार आहेत व आपले कौशल्य यानिमित्तताने दाखवणार आहेत, अंबिका माता देवीचे दर्शन घेण्यासाठी गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविक हे खूप मोठ्या प्रमाणात या यात्रेनिमित्त येत असतात.
यात्रेच्या पाचव्या दिवशी म्हणजेच २ मे रोजी खास महिलांसाठी ज्ञानसंवर्धनी शाळेच्या ग्राऊंडवर रात्री ९ वाजता महाराष्ट्राची प्रसिध्द नृत्यांगना राधा पाटील यांच्या लावणी तथा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी अंबिका मातेची यात्रा संपन्न होणार आहे अशी माहिती यात्रा कमिटीच्या वतीने जनसंघर्ष न्यूच्या प्रतिनिधींना यावेळी देण्यात आली.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह