जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
संजय वैशंपायन
मुंबई :– निवडणुकीच्या काळात मुंबई बाहेर बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची घरवापसी झाली पण अद्याप या अधिकाऱ्यांना छप्पर न मिळाल्यामुळे झाडाखालीच दिवस कंठावे लागत आहेत.
वास्तविकता मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यात रिक्त पदे आहेत परंतु या पोलिस अधिकाऱ्यांना पोस्टिंग न मिळाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयात हजेरी लावून पोस्टिंग साठी पोलीस आयुक्तालयाच्या इमारती बाहेर असलेल्या झाडाखाली थांबून राहावे लागत आहे.राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात मुंबईसह राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्हा बाहेर करण्यात आलेल्या होत्या. एकट्या मुंबईतून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक या पदावरील जवळपास 170 जणांची बदली मुंबई जिल्ह्याबाहेर करण्यात आली होती.
मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात कार्यकाळ बाकी असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा यामध्ये समावेश होता आणि या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतर मुंबईतील अनेक पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशिवाय रिक्त ठेवण्यात आली होती. या सर्व पोलीस ठाण्यांचा अतिरिक्त कार्यभार पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आला होता.
विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर निकाल लागताच मुंबईतून बदली करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांना पुन्हा मुंबईत आणले गेले. या सर्व पोलिसांची घर वापसी झाल्यानंतर सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये हजेरी लावली.
यानंतर जवळपास दोन आठवडे उलटले तरीही पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दररोज पोलीस मुख्यालयात हजेरीसाठी दाखल होतात आणि पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात पोस्टिंगची वाट पाहत थांबत असतात. नुकतेच मंगळवारी काही जणांना पोस्टिंग देण्यात आलं परंतु जवळपास 68 वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे अद्यापही पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली होती त्याच पोलीस ठाण्यात तीच खुर्ची अद्यापी रिकामी असून तेच पोलीस ठाणे मिळावे म्हणून बहुसंख्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुख्यालयाबाहेर प्रार्थना करत असल्याची चर्चा पोलिसांमध्ये आहे.
गतिमान प्रशासनाचा दावा करणारे प्रशासन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कामाशिवाय ठेवून काय साधत आहे? हाच संशोधनाचा विषय असल्याचे बोलले जात आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह