जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर, ता.२८ : इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे श्री यशवंतराय तरुण मंडळाच्या वतीने यंदा सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गणरायाच्या आगमनानिमित्त मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, विशेष आकर्षण ठरणार आहे महिलांसाठी आयोजित “होम मिनिस्टर” स्पर्धा.
ही स्पर्धा शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ७ वाजता पार पडणार असून महिलांसाठी खास बक्षिसांची आकर्षक मेजवानी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेत्यांना पैठणी साडी, सोन्याची नथ, चांदीचे नाणे, फॅन्सी दागिने यासह अनेक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. त्यामुळे गावातील तसेच परिसरातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमासाठी चंदकाका सराफ बारामती यांच्या तर्फे आकर्षक सोन्या-चांदीची बक्षिसे प्रायोजित करण्यात आली आहेत. “लकी ड्रॉ”च्या माध्यमातून प्रेक्षकांनाही बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी यावेळी मिळणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे.
म्हसोबावाडीतील चांदगुडे वस्ती येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यामध्ये महिलांसह कुटुंबियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या या उपक्रमामुळे गावातील सामाजिक एकात्मता वृद्धिंगत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
आयोजक श्री यशवंतराय तरुण मंडळाने ग्रामस्थांसह सर्वांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. गणेशभक्ती, सांस्कृतिक विविधता आणि उत्साह यांचा संगम असलेल्या या होम मिनिस्टर स्पर्धेमुळे म्हसोबावाडीतील गणेशोत्सव अधिकच संस्मरणीय होणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 67