वालचंदनगर पोलीस ठाण्याचे गौरवशाली यश – १३ गुन्हेगारांवर मोक्का, ISO मानांकनासह राजकुमार डुणगेंच्या कारकिर्दीचा डंका !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज/ संपादकीय
इंदापूर, ता.१६ :- इंदापूर तालुका व सोलापूरच्या माळशिरस परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात निर्णायक पाऊल उचलत वालचंदनगर पोलिसांनी तेरा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीतील राजू भाळे यासह तेरा सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईची परवानगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. या कामगिरीमुळे प्रभारी पोलीस अधिकारी राजकुमार डुणगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राजकुमार डुणगे यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यावर आपला भर दिला. तत्कालीन प्रभारी दिलीप पवार यांच्या कार्यानंतर डुणगे यांनी गुन्हेगारीविरोधात आक्रमक मोहीम राबवून गुन्हेगारांचे कंबरडे मोडले. याआधी सासवड येथील बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणातील तिसरा आरोपी पकडण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहिल्याच दिवसापासून गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले डुणगे आता मोक्का कारवाईमुळे जनतेच्या नजरेत ‘हिरो’ ठरत आहेत.
याच काळात वालचंदनगर पोलीस ठाण्याने आणखी एक मोठा मान मिळवला आहे. पोलीस ठाण्याला आय.एस.ओ 9001-2015 प्रमाणपत्र प्राप्त झाले असून त्यामुळे पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हे दुसरे आयएसओ मानांकन मिळवलेले स्मार्ट पोलीस स्टेशन ठरले आहे. अ++ ग्रेडसह मिळालेल्या या प्रमाणपत्रासाठी पोलीस ठाण्याने 37 निकषांची पूर्तता केली आहे. यात पायाभूत सुविधा, तक्रार निवारण, गुन्ह्यांचा निपटारा, संगणकीकरण, रात्रगस्त, अवैध धंद्यांवर कारवाई आणि नागरिकाभिमुख सेवा यांचा समावेश आहे. पाहणीत पोलीस ठाण्याला 100 पैकी तब्बल 93 गुण मिळाले.
1990 मध्ये स्थापन झालेल्या वालचंदनगर पोलीस ठाण्याची नव्याने 9 कोटी रुपये खर्च करून सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. 5 एकर परिसर असलेल्या या ठाण्यात अधिकारी निवासस्थान, स्वच्छता, हिरवाई, पार्किंग, तक्रारदारांसाठी सुविधा यांचा उत्तम संगम आहे. पोलीस दलातील विविध विभागांसाठी स्वतंत्र कक्ष, कैद्यांसाठी कोठडी, अग्निशामक यंत्रणा व आधुनिक तंत्रज्ञान यामुळे ठाण्याला आधुनिक रूप लाभले आहे.
अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे वालचंदनगर पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील आदर्श ठाणे म्हणून नावारूपास आले आहे. एका बाजूला गुन्हेगारीवर मोक्का सारखी कठोर कारवाई तर दुसरीकडे स्मार्ट पोलीस स्टेशनचा दर्जा – यामुळे वालचंदनगर पोलिसांचा लौकिक आणखी उंचावला आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai