जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
कळंब :- कळंब तालुक्यातील खामसवाडी गावाने माणुसकीचा मोठा आदर्श निर्माण केला आहे. वीजेच्या धक्क्याने अनिल गुंड या 38 वर्षीय कष्टकरी बापाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला. अर्ध्या एकरात कसाबसा संसार उभा करणाऱ्या या कुटुंबाचं दुःख पाहून संपूर्ण गाव धावून आलं. गावकऱ्यांनी एकत्र येत त्या परिवारासाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरु केला, आणि आजही तो अखंड सुरू आहे.
अनिलची मोठी मुलगी पाचवीत, दुसरी तिसरीत तर तिसरी अजून शाळेतही गेली नाही. घर नव्हतं, चार पत्र्याच्या शेडमध्ये संसार होता. अनिलने ट्रॅक्टर चालवणे, गवंडीकाम, शेतमजुरी अशा अनेक कष्टांची कामं करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. पत्नीनेही त्याला खंबीर साथ दिली. पण नियतीने असा घात केला की, त्या चिमुकल्यांच्या डोक्यावरून बापाचं छत्रच हरपलं.
या घटनेनंतर गावातील काही तरुण – सोमनाथ हिरे, अमोल रोहिले, सादिक सय्यद यांनी पुढाकार घेत सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केलं. गावातील व्हॉट्सअॅप ग्रुप्स, सोशल मिडियावरून माहिती पोहोचवली गेली. गावातच एक मदतीसाठी पेटी ठेवण्यात आली. या आवाहनाला गावकऱ्यांनी ओलख दिली. हजारो नागरिकांनी आपापल्या परीने 100 ते 2000 रुपये रोख स्वरूपात मदत केली. काही बचतगटांनी 10 ते 15 हजारांची मदत केली. अनिलचे वर्गमित्रही मदतीला सरसावले. महिलांनी, मुलींनीही पुढाकार घेतला.
गावाबाहेर असलेले मुंबई, पुणे येथे काम करणारे तरुणही गप्प बसले नाहीत. त्यांनी फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून मदत पाठवली. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनीही पुढाकार घेत तात्पुरत्या निवाऱ्यासाठी 1 लाख रुपये जाहीर केले.
जमा झालेल्या रकमेतून एक भाग कुटुंबाला तात्काळ दिला जाणार असून, उर्वरित रक्कम मुलींच्या नावावर बँकेत ठेवण्यात येणार आहे. यामागचा उद्देश म्हणजे त्यांच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ उभं करणं.
मदतीचा ओघ अजूनही सुरु आहे…
या संकटकाळात संपूर्ण खामसवाडी गाव एकवटलं आहे. श्रीमंतीने नाही, तर मनाने श्रीमंत गावकऱ्यांनी दाखवलेली ही एकोपा आणि मदतीची भावना खरोखरच स्तुत्य आहे. अशा वेळी सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन या कुटुंबाला एक घर आणि मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, तर हे दुःख थोडं सुसह्य होईल.
खरोखरच, बाप गेला, पण गाव त्याच्या चिमुकल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे…

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह