जनसंघर्ष न्यूज नेटवर्क/३१ जुलै
मुंबई : राज्यातील मंत्रीमंडळात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र सुपूर्त केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या पत्रात मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खाते बदलण्याची विनंती करण्यात आली होती.
सध्या माणिकराव कोकाटे यांच्याकडे राज्याचे कृषी खाते आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. मात्र, त्यांचा थेट राजीनामा न घेता त्यांच्याकडील महत्त्वाचं कृषी खाते काढून घेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
नव्या शिफारसीनुसार, कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेऊन त्यांना क्रीडा व युवक सेवा खात्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. सध्या हे खाते मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यातही बदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोकाटेंकडील कृषी खात्याचा कारभार कोणाकडे सोपवायचा, यावरही आज निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री सुनील तटकरे यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत कृषी खाते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं.
राजकीय वर्तुळात यामुळे हालचालींना वेग आला असून, आगामी काही दिवसांत अधिकृत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्र्यांवरील वादग्रस्त कृतीमुळे प्रशासन व कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं जाणकार सांगतात.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह