जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर (ता. २६ जुलै) — पुणे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने आणि पवार स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने व समस्त ग्रामस्थ म्हसोबाचीवाडी यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ५ व्या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ आज इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे जल्लोषात झाला. या स्पर्धेचे आयोजन पवार स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक किरण पवार व यांच्या टीमच्या पुढाकाराने करण्यात आले असून, ग्रामीण भागातील सुप्त गुणांमध्ये निपुण खेळाडूंना व्यासपीठ मिळावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून किरण पवार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळासाठी आवश्यक प्रशिक्षण, सुविधा आणि संधी निशुल्क उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचा हा उपक्रम आज यशाच्या शिखरावर पोहोचला असून, पवार स्पोर्ट्स अकॅडमीतील अनेक मुले-मुली नॅशनल लेव्हलवरील स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवत आहेत.
या वर्षीच्या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक नामांकित संघांचा सहभाग आहे. कोथरूड, निगडी, डेक्कन, धायरी, छत्रपती संभाजीनगर, सासवड, भिगवण, इंदापूर, बारामती, शारदानगर, दौंड आणि म्हसोबाचीवाडी येथील व्हॉलीबॉल संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा अधिकच प्रतिष्ठेची ठरली आहे.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी खेळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांनी आपल्या कारकिर्दीचा मार्ग शोधावा, असा संदेश दिला. स्पर्धेच्या आयोजनामुळे म्हसोबाचीवाडी परिसरात उत्साहाचे वातावरण असून, स्थानिक ग्रामस्थ आणि पालक वर्ग यांचाही मोठा सहभाग लाभत आहे.
पवार स्पोर्ट्स अकॅडमीने या स्पर्धेमध्ये केवळ मुलांनाच नव्हे तर मुलींनाही समान संधी दिली आहे. त्यांच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंमध्ये शिस्त, फिटनेस, आणि सामूहिक कामगिरीचे मूल्य रुजवले जाते. त्यामुळे या अकॅडमीचे नाव आज संपूर्ण पुणे जिल्ह्यात आदराने घेतले जाते.
या स्पर्धेमुळे स्थानिक पातळीवरील खेळाडूंना राज्यस्तरावरील खेळाडूंशी ताकदीची स्पर्धा करता येणार असून, त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडणार आहे. पुढील काही दिवस चालणाऱ्या या स्पर्धेकडे सर्व क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे.
किरण पवार आणि त्यांच्या पथकाचे या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच विष्णू दाभाडे, रघुनाथ दाभाडे, धनंजय दाभाडे ,दत्तात्रय पवार ,संदीप पवार ,अनिकेत झेंडे, पंकज चांदगुडे ,डॉ. स्वप्नील झेंडे, सिकंदर मुलाणी, हरिदास साळुंखे ,अक्षय राऊत, सुजित सुर्यवंशी ,लालासो साळुंखे , म्हसोबाचीवाडी क्रिकेट क्लब ,प्राथमिक शाळा शिक्षक वृंद या मान्यवरांचे स्पर्धेला विशेष सहकार्य लाभले आहे.
ग्रामीण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या क्रीडासंस्कृतीची रुजवणूक होत असल्याने, हे आयोजन केवळ एक स्पर्धा नसून एक सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ ठरली आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह