जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
दौंड, ता.२३ : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी (ता.दौंड, जि. पुणे) येथे जमिनीच्या वाटणीच्या वादातून भीषण हाणामारीची घटना घडली आहे. या हाणामारीत भाऊ व मुलांनीच स्वतःच्या भाच्यांना व बहिणीला जबर मारहाण केली. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
धैर्यशील राजेंद्र चौधरी (रा. बोरिपार्धी, धायगुडेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सांगितले की, 15 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपल्या घरी जात असताना त्यांनी आई व भावाला काही नातेवाईकांनी मारहाण करताना पाहिले. भांडण सोडविण्यासाठी ते पुढे सरसावले असता त्यांनाही नागनाथ शेलार व त्याचे कुटुंबीय तसेच ईश्वर चव्हाण या भाडेकरूने लाकडी काठी, लाथा व बुक्क्यांनी मारहाण केली.
या वादाचे मूळ कारण म्हणजे फिर्यादीच्या आई व तिच्या भावामध्ये कोर्टात सुरू असलेला जमिनीच्या वाटणीचा वाद असल्याचे समजते. या वैमनस्यातूनच आरोपींनी ‘ही जागा आमची आहे, तुम्ही इथे राहायचं नाही’ असा दम देत जबर मारहाण केली.
या मारहाणीमध्ये फिर्यादीची आई संगिता चौधरी गंभीर जखमी झाली असून आरोपी मंगेश शेलारने तिच्या चेहऱ्यावर मारून एक दात फोडल्याचे नमूद आहे. शिवाय सर्वांना जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तेथून पसार झाले.
फिर्यादीवरून यवत पोलिसांनी नागनाथ शेलार, मंगेश शेलार, मयुर शेलार, संगीता शेलार, पुनम शेलार व ईश्वर चव्हाण या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नूतन चव्हाण करत आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह