जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे, ता.१९ : गावकऱ्यांच्या सहनशक्तीचा बांध आता तुटला आहे. पाणी नाही, रस्ता नाही, रोजगार नाही, आरोग्य नाही… मग विकास कुठे आहे? गावातल्या समस्या ऐकूनही कानाडोळा करणाऱ्या शासन-प्रशासनावर आता ग्रामस्थ थेट झडप घालू लागले आहेत. “नेते निवडणुकीत आमच्या दारात येतात, आमच्या माथ्यावर हात ठेवून खोट्या आश्वासनांची खैरात करतात, आणि निवडून आल्यानंतर आम्हाला मृत्यूसोबत झुंज देण्यासाठी सोडून जातात. आमचं आयुष्य हे त्यांच्या मतांसाठीचा खेळ झाला आहे!” असा संतापजनक उद्गार नागरिकांनी काढला.
अनेक गावाची अवस्था इतकी बिकट आहे की उन्हाळा सुरू होताच वाडया वस्त्यांवरील महिलांना पाण्यासाठी डोक्यावर घागर घेऊन किलोमीटर लांब पायपीट करावी लागते. पाण्याचा एक थेंब मिळवताना जणू युद्ध लढावं लागतं. शेतकरी हताश झाला आहे. शेती कोरडी पडली, पीक विमा मिळाला नाही, बाजारात भाव नाही, खत-बियाणं आकाशाला भिडलं. सरकारच्या घोषणा फक्त जाहिरातींमध्ये आहेत, शेतकऱ्यांच्या घरात मात्र सततची उपासमारी आहे.
आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था पाहून ग्रामस्थ संतापले आहेत. आरोग्य केंद्र आहेत, पण औषधं नाहीत, डॉक्टर नाहीत. आजारी माणूस शहरात नेता नेता रस्त्यातच प्राण सोडतो. शिक्षणाच्या सोयी नसल्याने मुलांचं भविष्य अंधारात जातं. रस्त्यांची अवस्था तर कब्रस्तानासारखी! आहे , खड्डेच खड्डे… अपघातात होरपळणाऱ्या नागरिकांची सरकारला कसल्या प्रकारची फिकीर नाही.
“आमच्या गावांकडे लक्ष द्या, नाहीतर आम्हीच तुमच्याकडे येऊ; पण तेव्हा आमच्या हातात फक्त अर्ज नसेल, तर आंदोलकांचा डंडा असेल” असा थेट इशारा आता ग्रामस्थांनी दिला आहे.
गावकऱ्यांचा हा आक्रोश आता रोखता येणं कठीण आहे. ग्रामीण भागातील जनता पेटली आहे. जर तातडीने पाणी, रोजगार, आरोग्य, रस्ते व स्वच्छतेच्या समस्या सोडवल्या नाहीत, तर हा आक्रोश उद्या भीषण आंदोलनाच्या ज्वालांतून सत्ताधाऱ्यांना चटके देणार, हे निश्चित आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह