शेतकरी महामंडळ कामगारांच्या हक्कासाठी सत्याग्रह पायी मोर्चा –अन्यायाविरोधात कामगार रस्त्यावर”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क/संपादकीय
इंदापूर ता.१६ : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या कामगारांवर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय होत असून, त्यांच्या मूलभूत हक्कांबाबत शासन व प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कामगार आता रस्त्यावर उतरले आहेत. कामगारांच्या हक्कासाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजी रत्नपुरी मळा ते जंक्शन चौकापर्यंत ‘सत्याग्रह पायी मोर्चा’ काढण्यात आला.
तत्कालीन महसूल राज्यमंत्री श्री. रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या शिफारशींनुसार जागेचा ताबा व घर देण्याचे आश्वासन त्यावेळी कामगारांना देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात आजतागायत कामगारांना योग्य सुविधा मिळालेल्या नाहीत. अनेक कामगारांच्या घरांची अवस्था दयनीय झाली असून, काहींची घरे पावसाचे पाणी साचून राहण्यायोग्य राहिलेली नाहीत, तर काही घरे ही कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
कामगारांची मुख्य मागणी म्हणजे, २ गुंठे जागा आणि घर देण्याचा शासन निर्णय तात्काळ अमलात आणावा, तसेच ९० च्या दशकात कार्यरत असून आजही नोकरीवर असलेल्या कामगारांना ७x७ वा ६x६ असा जागेचा लाभ त्वरित मिळावा. शासनाने दिलेली आश्वासने वारंवार मोडीत निघाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या मोर्चाचे नेतृत्व श्री. शेखर बयाजी काटे, श्री. सागर दशरथ मिसाळ, आणि श्री. आकाश भाऊ पवार यांनी केले असून, मोर्चाद्वारे सरकारला अंतिम इशारा देण्यात आला आहे. “आमचे हक्क नाकारले गेले, तर आम्ही अधिक उग्र पध्दतीने आंदोलन छेडू,” असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
हा मोर्चा केवळ कामगारांच्या हक्कांसाठीच नाही, तर शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधातील तीव्र संतापाचे प्रतीक ठरले आहे. १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी हा पायी मोर्चा निघाल्याने, स्वातंत्र्याच्या खऱ्या अर्थाने लढा देण्याची ही वेळ आल्याचे आयोजक म्हणाले.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai