दत्तमंदिर पाण्याखाली : नृसिंहवाडीत पूरस्थितीचं सावट, कृष्णा-पंचगंगेच्या पुरामुळे दहशतीचं वातावरण.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
नृसिंहवाडी (जि. कोल्हापूर) – श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, याचा थेट फटका दत्त मंदिराला बसला आहे. गेल्या २४ तासांत पाणीपातळी तब्बल ८ फुटांनी वाढल्याने दत्त मंदिर निम्म्याहून अधिक पाण्याखाली गेले आहे. तसेच संगमावरील पवित्र संगमेश्वर मंदिर संपूर्णपणे जलमय झाले आहे. यामुळे श्री क्षेत्रात आलेल्या भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कोयना, राधानगरीसह परिसरातील अन्य धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सतत सुरू आहे. त्यामुळे कृष्णा व पंचगंगा या प्रमुख नद्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दत्त मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती प.प. नारायणस्वामी महाराज यांच्या मंदिरात हलवण्यात आली आहे. तेथेच त्रिकाळ पूजा आणि नित्य विधी पार पाडले जात आहेत. भाविकांसाठी मंदिर बंद करण्यात आलं असून, देवस्थान समितीने पूरामुळे होणाऱ्या नुकसानाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
दरम्यान, नृसिंहवाडी परिसरातील नदीकाठची शेतीही जलमय होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात नदीचं पाणी शिरू लागल्याने शेतकरी मोटारी हलवण्याच्या कामात व्यग्र झाले आहेत. तसेच जनावरांना सुरक्षित जागी हलवणे, त्यांच्यासाठी चाऱ्याची सोय करणे अशी लगबग गावात सुरू आहे.
स्थानिक प्रशासनाने पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली असून, आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नृसिंहवाडी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्री पाणी शिरल्याने धार्मिक भक्तांच्या भावना दुखावल्या असून, पावसाचा जोर न थांबल्यास हिवाळी काळातील उत्सवांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तरी नृसिंहवाडीतील जीवनमान नदीच्या कृपेवर अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें