जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर (दि. २९ जुलै):मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला शेटफळगडे – म्हसोबाचीवाडी – लासुर्णे मार्ग लाखो जनतेसाठी महत्त्वाचा असतानाही आजही अर्धवट अवस्थेत आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही कामाची गति नाही, दर्जा नाही,पण ठेकेदारांची कोट्यवधींची बिले मात्र काम पुर्ण होण्याअगोदरच अदा झाल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी आहे.
या रस्त्याच्या कामाची जबाबदारी एनपी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड व अमित कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांवर होती. मात्र शेटफळगडे ते म्हसोबाचीवाडी आणि म्हसोबाचीवाडी ते लासुर्णे असा संपूर्ण मार्ग ठिकठिकाणी अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचा राहिल्याची नागरिकांत चर्चा आहे. पुलांचे अधुरे काम, रस्त्यालगत सुरक्षेचा अभाव, कार्पेट थर कमी जाडीचा, आणि काही भागांतील रस्ते उखडल्यावर पुन्हा पूर्ण न केले जाणे – या सर्व त्रुटींमुळे पावसाळ्यात रस्ते चिखलमय होऊन नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे.
या कामांबाबत सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारांना तक्रारी करण्यात आल्या, मात्र उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा करण्यात आला. विशेष म्हणजे काम अपूर्ण असतानाही मार्च २०२४ पूर्वी संबंधित कंपन्यांची संपूर्ण बिले अदा करण्यात आली आहेत.
नागरिक आता या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी काय भूमिका घेणार याकडे लक्ष ठेवून आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी आता जोर धरत आहे. शासनाचा निधी, लोकांचा कर, पण लाभ कुणालाही नाही – हीच इंदापूरकरांची आजची हतबल अवस्था झाली आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 103